जाणून घ्या ग्राहकांचे अधिकार 
Arth Warta

सावधान! बँक खात्यातील रक्कम 'अशी' होऊ शकते वजा...जाणून घ्या ग्राहकांचे अधिकार

तुमच्या संमतीशिवाय पैसे कापले जातात? बँकिंगचा 'हा' नियम तुम्हाला माहितीये का?

Prachi Tadakhe

मुंबई: आपले बँक खाते म्हणजे आपली हक्काची सुरक्षित तिजोरी, असा आपला समज असतो. तांत्रिकदृष्ट्या हे जरी खरे असले, तरी बँकिंग नियमावलीतील काही तरतुदींनुसार बँक तुमच्या परवानगीशिवाय खात्यातून रक्कम वजा करू शकते. नेमक्या कोणत्या परिस्थितीत बँक असे पाऊल उचलते आणि एक ग्राहक म्हणून तुमचे काय अधिकार आहेत, याचा हा थोडक्यात आढावा.

बँक पैसे केव्हा आणि का कापते?

१. दिलेली पूर्वसंमती (Mandates): जेव्हा आपण कर्ज (Home/Auto/Personal Loan) घेतो, तेव्हा हप्ते भरण्यासाठी 'ऑटो-डेबिट'ची सुविधा घेतो. याशिवाय विमा हप्ता (Insurance Premium), एसआयपी (SIP) किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सबस्क्रिप्शनसाठी एकदा संमती दिली की, बँक दरमहा ठराविक रक्कम परस्पर वजा करते.

२. अदृश्य शुल्क आणि दंड (Service Charges): खाते उघडताना आपण अटी व शर्तींना (Terms & Conditions) मान्यता दिलेली असते. यामध्ये खालील बाबींचा समावेश होतो:

  • किमान शिल्लक (Minimum Balance): खात्यात ठराविक रक्कम न ठेवल्यास दंड.

  • इतर सेवा: एसएमएस अलर्ट, डेबिट कार्डचे वार्षिक शुल्क आणि ठराविक मर्यादेपेक्षा जास्त एटीएम वापराचे शुल्क.

३. सेट-ऑफचा अधिकार (Right of Set-off): हा नियम अनेकांसाठी नवीन असू शकतो. जर तुम्ही बँकेचे कर्ज थकवले असेल आणि त्याच बँकेत तुमचे दुसरे बचत खाते असेल, तर बँक थकीत कर्जाची वसुली करण्यासाठी तुमच्या बचत खात्यातील रक्कम वापरू शकते.

४. शासकीय किंवा न्यायालयीन आदेश: आयकर विभाग (Income Tax), ईडी किंवा न्यायालयाचा आदेश असल्यास, बँक ग्राहकाला पूर्वसूचना न देता खाते 'फ्रीज' करू शकते किंवा रक्कम संबंधित विभागाकडे वर्ग करू शकते.

चूक कोणाची? फसवणूक कशी ओळखावी?

कधीकधी तांत्रिक बिघाडामुळे एकाच व्यवहारासाठी दोनदा पैसे कापले जातात (Double Charge). जर कपात झालेली रक्कम बँकेचे शुल्क नसेल किंवा तुम्ही तशी संमती दिली नसेल, तर तो सायबर फसवणुकीचा प्रकार असू शकतो.

आर्थिक सुरक्षिततेसाठी ३ सुत्री

  • नियमित तपासणी: दरमहा बँकेचे स्टेटमेंट किंवा पासबुक तपासा.

  • तात्काळ तक्रार: संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्वरित बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी (Customer Care) संपर्क साधा किंवा शाखेत लेखी तक्रार द्या.

  • अलर्ट्सवर लक्ष: मोबाईलवर येणारे एसएमएस (SMS) आणि ई-मेल अलर्ट कधीही दुर्लक्षित करू नका.

SCROLL FOR NEXT