लग्नानंतरचे नाव, आद्याक्षरे किंवा स्पेलिंग दुरुस्ती; आता 'राजपत्र' आणि 'प्रतिज्ञापत्र' अनिवार्य. 
Arth Warta

आधार कार्डात नाव दुरुस्ती ? UIDAI ची नवी 'SOP' लागू!

आता प्रत्येक दुरुस्तीसाठी लागणार वेगळे प्रतिज्ञापत्र; जाणून घ्या 'SOP' मधील महत्त्वाचे बदल!

Prachi Tadakhe

भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि ओळखीचा मुख्य पुरावा मानले जाणारे आधार कार्ड (Aadhaar Card) अद्ययावत (Update) करणे आता अधिक शिस्तबद्ध आणि कडक करण्यात आले आहे. यापूर्वी आधार कार्डमधील नाव, पत्ता किंवा जन्मतारीख दुरुस्त करणे तुलनेने सोपे होते. मात्र, आता आधार कार्डावरील नाव बदलणे किंवा दुरुस्त करणे पूर्वीइतके सोपे राहिलेले नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नाव अद्ययावत करण्यासाठी एक नवीन मानक कार्यप्रणाली (SOP - Standard Operating Procedure) जारी केली आहे.

आधार (नोंदणी आणि अद्ययावतीकरण) नियम, २०१६ च्या नियम १९ अंतर्गत ही नवीन SOP लागू करण्यात आली असून, वेगवेगळ्या प्रकारच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र नियमावली आणि कागदपत्रांची अट अनिवार्य करण्यात आली आहे.

नवीन SOP मधील मुख्य बदल आणि नियम:

१. डेटा एंट्री त्रुटींसाठी स्वतंत्र प्रतिज्ञापत्र (Affidavit)

आधार नोंदणी करताना ऑपरेटरच्या चुकीमुळे नाव चुकीचे नोंदवले गेले असल्यास आणि इतर दस्तऐवजांमध्ये योग्य नाव असल्यास, आता केवळ दस्तऐवज देऊन चालणार नाही.

  • प्रौढांसाठी: परिशिष्ट-ब (Annexure-B) मधील प्रतिज्ञापत्र.

  • अल्पवयीनांसाठी: परिशिष्ट-क (Annexure-C) मधील प्रतिज्ञापत्र.

  • यासोबत विहित ओळखपत्र किंवा नातेसंबंधाचा पुरावा जोडणे अनिवार्य असेल.

२. विवाह किंवा घटस्फोटानंतर नाव बदलणे

विवाह किंवा घटस्फोटानंतर महिलांच्या आडनावात बदल करण्यासाठी Annexure-D मधील प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक राहील. यासोबतच अधिकृत ओळखपत्र सादर करावे लागेल.

३. टोपणनाव काढणे किंवा आद्याक्षरांमध्ये बदल

नावात असणारे टोपणनाव (‘उर्फ’/uff) काढून टाकणे अथवा एका आद्याक्षराऐवजी दुसरे आद्याक्षर जोडायचे असल्यास:

  • प्रौढांसाठी Annexure-E

  • अल्पवयीनांसाठी Annexure-F मधील प्रतिज्ञापत्र आवश्यक असणार आहे.

४. संपूर्ण नाव बदलासाठी 'राजपत्र' (Gazette Notification) अनिवार्य

एखाद्या व्यक्तीला आपले पूर्ण नाव किंवा मूळ ओळख बदलायची असल्यास राजपत्र अधिसूचना (Gazette Notification) अनिवार्य करण्यात आली आहे. यासाठी राजपत्रातील जाहिरातीसह जुन्या नावाची ओळखपत्रे सादर करावी लागतील.

५. पद आणि उपाधी (Titles) काढून टाकणे

नावापुढील श्री., श्रीमती, डॉ., कर्नल यांसारख्या पदव्या किंवा उपाधी काढून टाकण्यासाठी आता विशेष तरतूद करण्यात आली आहे. हे बदल विहित ओळखपत्रांच्या आधारे पार पडतील.

लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी:

  • जुनी प्रतिज्ञापत्रे चालणार नाहीत: नागरिकांनी जुन्या नमुन्यातील प्रतिज्ञापत्रे न वापरता नवीन SOP नुसार निश्चित केलेल्या नमुन्यांचाच वापर करावा.

  • आधार केंद्राला प्रत्यक्ष भेट: नाव अद्ययावत करण्यासाठी UIDAI च्या अधिकृत आधार केंद्राला भेट देणे आवश्यक आहे.

  • अपडेटची मर्यादा: नियमांनुसार आधार कार्डावर नाव बदलण्याची परवानगी सर्वसामान्यपणे केवळ दोनदाच दिली जाते. याहून अधिक वेळा बदल करायचा असल्यास केवळ राजपत्र आणि विशेष अपवाद प्रक्रियेद्वारेच तो शक्य होईल.

UIDAI च्या या नवीन SOP मुळे आधार दुरुस्तीची प्रक्रिया अधिक सुरक्षित होणार असली, तर नागरिकांना योग्य ती कागदपत्रे आणि नवीन प्रतिज्ञापत्रांची पूर्तता करूनच आधार केंद्रावर जावे लागणार आहे.

SCROLL FOR NEXT