
महिला संचलित असलेली तनिष्का नागरी सहकारी पतसंस्था तळेगाव दाभाडे ,तालुका मावळ,जिल्हा पुणे.सातत्यानं प्रगती करत असून नुकतीच पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. सर्व निवडी बिनविरोध झाल्या असून पतसंस्थेची वाटचाल सुरळीत चालावी यासाठी कार्यक्षम संकल्पना चालवणाऱ्या संस्थापक अर्चना घारे यांची अध्यक्षपदी व उपाध्यक्षपदी ज्योती बधाले यांची फेरनिवड करण्यात आली तर सचिवपदी शबनम खान व खजिनदारपदी सारिका विनोदे यांची निवड करण्यात आली.सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, वडगाव मावळ यांच्या मान्यतेने तसेच निवडणूक निर्णय अधिकारी एम. ए. जरे यांच्या अध्यक्षतेखाली पतसंस्थेची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. यावेळी सर्वानुमते नूतन पदाधिकारी व संचालक मंडळाची निवड जाहीर करून नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी संस्थापक अध्यक्षा अर्चना घारे म्हणाल्या, ही महिला संचलित असलेली तालुक्यातील एकमेव सर्वसाधारण पतसंस्था असून संपूर्ण संचालक मंडळ महिला व कर्मचारीही महिला आहेत. पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने कामकाज सुरू असल्याने संस्थेच्या कामकाजाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. संस्थेमार्फत लवकरच सोनेतारण कर्ज योजना सुरू करण्यात येणार असून, सभासदांना अल्पदराने सोप्या अटींवर त्वरित कर्ज उपलब्ध करून देण्याचा मानस घारे यांनी व्यक्त केला. संस्थेचे ३,५५७ सभासद असून ६ कोटी १९ लाख २३ हजार २३१ रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. तसेच ७ कोटी ९८ लक्ष ८२ हजार १८२ रुपयांच्या ठेवी, सुमारे १० कोटींची वार्षिक उलाढाल असून यावर्षी ९ लाख ८० हजार ९६० नफा झाला आहे. लवकरच वार्षिक अहवाल सादरीकरण व लाभांश वितरणाचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचेही घारे यांनी सांगितले.