
इचलकरंजी येथील महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यात कार्यक्षेत्र असलेली कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक आता गुजरात राज्यात शाखाविस्तार करणार आहे. त्यादृष्टीने बँकेची वाटचाल सुरु असल्याचे सांगत सभासदांना १० टक्के लाभांश देण्याची घोषणा करून चालू आर्थिक वर्षात बँक ५ हजार कोटी रुपयांचा टप्पा निश्चितपणे पार करेल, असा विश्वास कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी (मल्टिस्टेट शेड्युल्ड) बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे यांनी व्यक्त केला.
येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. त्याप्रसंगी चेअरमन स्वप्निल आवाडे बोलत होते. याप्रसंगी बँकेचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे व आमदार राहुल आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वप्निल आवाडे यांनी, सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या दूरदृष्टीकोनातून स्थापन झालेल्या छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. त्याचबरोबर सर्व समाजातील घटकांना आर्थिक बळ देत त्यांची आर्थिक उन्नती साधण्याचे काम बँकेने अविरतपणे सुरु ठेवले आहे. बँकेच्या माध्यमातून सुरु असलेल्या शासकीय योजनांचा लाभ सभासदांसह नवउद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन केले. बँकेच्या उन्नतीबरोबरच सभासदांचा विश्वास अखंडीत ठेवण्याची बांधिलकी यापुढेही कायम राहिल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
माजी आ.प्रकाश आवाडे यांनी, शहरातील उद्योगवाढीला आणि कामगाराला मालक बनविण्यासाठी या बँकेने बळ दिले आहे. स्वप्निल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली बँकेची घोडदौड वेगाने सुरु आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून शहरातील टाकवडे वेस, तारदाळ आणि कोरोची याठिकाणी ३ हजार घरकुले उभारण्याचा मानस असून त्यासाठी आवाडे जनता बँकेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयव शिरगांवे यांनी नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन केले. सर्वच विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजूरी दर्शविली. आभार व्हा. चेअरमन संजय अनिगोळ यांनी मानले. याप्रसंगी प्रकाश दत्तवाडे, बीओएम चेअरमन चंद्रकांत चौगुले, अशोकराव सौंदत्तीकर, डी. जी. कोरे, सौ. वैशाली आवाडे, पी. टी. कुंभार, जयप्रकाश शाळगांवकर, मॅनेजर किरण पाटील, दीपक पाटील, आण्णासाहेब नेर्ले आदींसह बँकेचे सर्व संचालक, सभासद यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.